Tuesday 25 August 2020

माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल भाग १

माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल

भाग १


ह्या लेखातून मला वेगवेगळ्या संगीत प्रकारांची, गायकांची ओळख कशी झाली ते सांगण्याचा प्रयत्न आहे. 
खरंतर माझ्या सारख्या माणसाने स्वतःच्या गाण्यांच्या "षोक"ला सांगितिक वाटचाल म्हणणे म्हणजे, असू द्या.. "गांडूळ-शेषनाग, उंदीर-ऐरावत" ह्या चांगल्या उपमा पुलंनी आधीच वापरल्याने मी काही नवीन उपमा देणे म्हणजे, राम गोपाल वर्माने "देवदास"चा रिमेक केल्यासारखे होईल.

मला कळायला लागल्यापासून घरात रेडिओ असल्याने, रेडिओवरची गाणी हा एक अविभाज्य भाग आहे. आणि तो आजतागायत आहे. फक्त माझा आणि रेडिओचा आकार व्यस्त प्रमाणात बदलत राहिला. रेडिओ आधी मोठ्ठा होता, मग ट्रान्झिस्टर, पॉकेट रेडिओ व आता मोबाईल ऍप पर्यंत छोटा झाला. आणि माझा आकार.. असू द्या.

हल्ली जसा घरोघरी टीव्ही असतो तसा पूर्वी रेडिओ असायचा. हा काळ १९७८ ते ८८ मधला आणि गाव नंदुरबार. मुळात दादांना हिंदी फिल्मी गाणे खूप प्रिय होते. माझे असं अवलोकन आहे की, आपल्याला आपल्या तरुणपणी गाजलेल्या गाण्यांपेक्षा आपण बाल्य अवस्थेत असताना आलेली गाणी जास्त आवडतात. दादांचे तसेच काहीसे असेल. त्यांना १९५० ते ६० च्या दशकातील गाणी आवडायची. रेडिओला पूर्वी फार काही पर्याय नव्हते, जे पदरात पडेल ते गोड मानून घ्यायचे. दादांचे आवडते जुने गाणे सुरुवातीला कंटाळवाणे वाटायचे, पण नंतर ते आवडू लागले.

दादांमुळे आणि रेडिओमुळे आम्हाला अमुक गाणे अमुक सिनेमातले, विशेष करून पडद्यावरचे कलाकार कोण होते हे कळले. दादांचे आवडते कलाकार म्हणजे राजकपूर, गुरुदत्त, दिलीपकुमार हे.
रेडिओमुळे संगीत क्षेत्रातील कलाकार कळू लागले. गायिका आहेत - लता मंगेशकर, संगीतकार - शंकर जयकिशन. उर्दू सर्व्हिस वाले - नगमानिगार है हसरत जयपुरी, असले सामान्य ज्ञान बालपणी प्राप्त झाले.
आम्हा भावंडाना तेव्हाची नविन गाणी रेडिओ वाजली की मजा यायची. पण रेडिओ वाल्यांचा असा काही नियम असावा की गाणं चांगलं ४-५ वर्ष जुनं झालं, छान लोणच्या सारखं मुरलं की मगच ते रेडिओवर वाजवायचं. 
आता त्यातली काही ऐकली तर आपण का ही गाणी सहन केलीत?  असा प्रश्न पडतो. उदा. "ओ देवी श्रीदेवी, तू नही"..वगैरे.
ह्यातली बरीच (आता टुकार वाटतात) गाणी जितेंद्रच्या पिक्चर मधली असायची.
अमिताभच्या पिक्चरला ऍक्शन जास्त असली तरी गाणी चांगली असायची. नशिबाने, तेव्हाची बरीच गाणी RD बर्मनची सुद्धा असल्याने ती गाणी तेव्हाच काळाच्या पुढची होती. 

दादा दर बुधवारी न चुकता "बिनाका गीतमाला" रेडिओ सिलोनवर ऐकत. बिनाकामध्ये फक्त नविन गाणी वाजविली जायची त्यामुळे आम्हीही ते आवडीने ऐकायचो. शॉर्ट वेव्ह रेडिओला तेव्हा २-३ मिनिटे प्रयत्न केला की स्टेशन ट्यून व्हायचे. मधेच एखादे स्टेशन पकडले जायचे जिथे अरबी किंवा फारशी भाषेत बातम्या सुरू असायच्या. 

बिनाकाचे सर्वेसर्वा अमीन सायनी यांना आम्ही "बैनो भय्यो" म्हणायचो. बिनाकाचा वार्षिक कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच असायची. डिसेंबरच्या शेवटच्या दोन बुधवारी तो असायचा. आम्हाला उत्सुकता असायची की ह्या वर्षी कोणते गाणे पहिले येणार. टीव्ही नसल्याने नवीन वर्षाचे "रंगारंग" कार्यक्रम तेव्हा आमच्या नशिबी नव्हते. 

संजय सोनार
(क्रमशः)

No comments:

Post a Comment