माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल
भाग २ - टेप रेकॉर्डरचे राज्य
साधारण १९८४ च्या आसपास टेप रेकॉर्डर आणि कॅसेटचा उदय झाला आणि एक नवीन जादूचे खेळणे हाती पडावे असे आमचे झाले.
आपल्या आवडीची गाणी, पाहिजे तेव्हा, कितीही वेळा ऐकता येणार! अर्थात त्याआधीही LP रेकॉर्डस् आणि ग्रामोफोन होतेच. पण मध्यम वर्गाकडे ते नव्हते आणि छोट्या शहरात तर एक-दोन बड्या असामींकडे तसे ग्रामोफोन असतील. कशी गम्मत आहे पहा, नावात "ग्राम" आहे, पण वस्तू फक्त महानगरासाठी!
सर्वात आधी टेपरेकॉर्डर आम्ही मामाकडे असतांना, माझे पुण्याचे मावसा यांनी आणला. आम्ही सुद्धा हट्ट करून दादांना टेप घ्यायला लावला.
आमच्या शाळेसमोरच्या एका सिंधी माणसाच्या दुकानात, सोनीटोनचा टेप आम्ही ऑर्डर करून ठेवला होता. तो स्टॉक मध्ये नसल्याने, बरेच दिवस आम्ही रोज जाऊन विचारायचो "सोनटोनका टेप आया क्या?". :)
आणि शेवटी टेप आमच्या घरी वाजत-गाजत आला.
सुरुवातीला आमच्याकडे ज्या कॅसेट होत्या त्या बऱ्याच दादांच्या आवडीच्या होत्या. चोरी-चोरी-आवारा, नया दौर-मधुमती, श्री४२०-आह, तेरे घरके सामने ई. काही दिवसांनी मग आम्ही देशप्रेमी-नमक हलाल, कर्ज-कुर्बानी असल्या कॅसेट आणल्या. मराठीच्या नावाने फक्त पहाटेची भक्ती गीते आणि प्रल्हाद शिंदे!
एव्हाना, गाणी म्हणजे फक्त हिंदी पिक्चरची.. झालंच तर मराठी गाणी रेडिओवर वाजली तीच. नंदुरबार मध्ये मराठीपेक्षा हिंदी पिक्चर जास्त चालायचे. आणि TV नसल्याने मराठीच्या एका मोठ्या खजिन्यापासून मी वंचित होतो.
मराठी भावगीते यांचा तर गंधही नव्हता. आता कळते की बालभारतीच्या पुस्तकातल्या बऱ्याच कविता "भावगीत"च आहेत. शाळेत संगीत शिकवणाऱ्या बाईंमुळे साने गुरुजी, सावरकर यांच्या गीतांशी ओळख होती.
एकदा दादांच्या ऑफिस मधले एक सर घरी आले होते. त्यांच्या मुलाने "सुधीर फडकें"ची कॅसेट दिली. काही दिवस ऐकायला. मुळात माझ्या दुर्दैवाने मला सुधीर फडके माहीत नव्हते. काही दिवस कॅसेट ऐकली पण "आपल्या type ची नाही" म्हणून परत केली.
तेव्हा आमची आवड म्हणजे "चल मेरे भाई तेरे पाव पडता हू".. अशी होती.
आमच्या शेजारी भरत नावाचा एक होतकरू तरुण राहत होता. तो कॉलेज वगैरे झाला असेल किंवा त्या वयाचा होता. त्याच्याकडे असलेले collection भारीच होते. मोहम्मद रफीचा तो भक्त होता. आम्हाला मात्र किशोर कुमार सोडून काही कळायचे नाही की आवडायचे नाही.
आमच्या गल्लीत आम्ही गोकुळाष्टमीच्या जागरणासाठी "ऑर्केष्ट्रा" बसवला होता. आमची ऑर्केष्ट्राची व्याख्या म्हणजे खऱ्या अर्थाने गाणी-नाच, एखादे नाटक. भरतची मदत घेऊन आम्ही गाणी बसविली. त्याने गाणे लिहून देखील दिले. माझ्या भावासाठी (आप्पा) "ये दुनिया ये महफिल", माझ्यासाठी "खिलौना जानकर"..:) त्याचा आयुष्यातला "दर्द" त्याने आमच्या करवी पेश केला होता.
भरत कडून अजून एक गोष्ट कळली ती म्हणजे "बुलबुल" (बँजो). हे पहिले वाद्य मी स्वतः हाताळून पाहिलेले. त्यावर भरतने आम्हाला "जिंदगी एक सफर है सुहाना" शिकवले होते. अर्थात एक-दोन ओळीच.
हे सर्व किशोर वयात असतांना चालू होते.
एक नवीन माहिती अशी मिळाली की मोठमोठे प्रोड्युसर डायरेक्टर, आपल्या पिक्चर मध्ये एक धून सतत वाजवत असतात. ती त्या पिक्चरची थीम असे. उदा. सुभाष घईच्या पिक्चरमध्ये हे हमखास असायचं. कर्ज, क्रोधी, विधाता, मेरी जंग, कर्मा. राज कपूर सुद्धा "RK" च्या पिक्चरच्या संगीताबद्दल चोखंदळ होता. "राम तेरी गंगा मैली"च्या गाण्यात रवींद्र जैनला संधी देऊन नवीन काही करण्यात राज कपूर पुढे होता.
८५-८६ मध्ये के.सी.बोकाडीया नावाचा एक प्रोड्युसर आला, "प्यार झुकता नहीं" घेऊन. तुमसे मिलकर ना जाने क्यो, हे गाणे सर्वांच्या ओठावर होते. त्याचे संगीत बहुदा पहिले "ऑफिशियल" T-सिरीज वर असेल.
के.सी.बोकाडीयाचे पिक्चर "कामचलाऊ" असले तरी, त्यातली गाणी त्यावेळी खूप गाजली.
१९८७ साली गावात TV आले. पण २४ तास नसल्याने रेडिओ-टेपची जागा अबाधित होती.
दहावी पास होऊन धुळ्यात polytechnic ला जाई पर्यंत कान फिल्मी गाणे ऐकून तयार झाले होते.
क्रमशः
संजय सोनार
No comments:
Post a Comment