Tuesday, 25 August 2020

क्रायसिस

हल्ली एक नवा "क्रायसिस" निर्माण झाला आहे - माझे "वाचन". 

स्वतःपुरता मर्यादित असल्याने हा फार गहन किंवा गंभीर विषय नाही. मला एकाग्रपणे वगैरे वाचता येतच नाही. वाचता वाचता सतत कसले तरी विचार चालू असतात. साधं उदाहरण, मित्राने लिहिलेले पुस्तक वाचायला घेतले, पण पुढे लवकर सरकता येत नाही. वाचतांना, ह्या लेखात विशेष काय आहे? मित्राला अभिप्राय लिहिताना काय-काय टिपता येईल, हे सर्व उद्योग चालू होते. 

एव्हाना मला कुठलेही पुस्तक वाचतांना भराभर पुढे जात येत नाही. कदाचित "ग्रहण-शक्ती" कमी पडत असावी. काही जुन्या गोष्टी आठवतात, काही ठिकाणी "उत्सुकता" उफाळून बाहेर येते, मग गूगल करा, विकीपेडिया, एका लिंकवरून दुसऱ्या. डोक्यातल्या  सगळ्या लिंक जागेवर परत आल्या की, "कुठे होतो मी?" असं म्हणून पुन्हा पुस्तकात जाण्याचा प्रयत्न! एकूणच, कोणीतरी माझी परीक्षा घेणार आहे, असा काहीसा समज करून मी वाचत असतो. 

मला सहजपणे वाचता येणारी गोष्ट म्हणजे "पेपर". परीक्षेतील पेपर नाही, वर्तमानपत्र! हल्ली कोरोनाच्या बातम्यांमुळे तेही वाचायला कंटाळा येतो. रोजचे आकडे बघून कालचे किती होते? पुन्हा परीक्षेचा फील.
कदाचित वाचनाची सवय नसल्याने असेल. आता थोडे वाचन वाढवावे लागणार, आणि विचार कमी ! :)


संजय सोनार

माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल भाग १

माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल

भाग १


ह्या लेखातून मला वेगवेगळ्या संगीत प्रकारांची, गायकांची ओळख कशी झाली ते सांगण्याचा प्रयत्न आहे. 
खरंतर माझ्या सारख्या माणसाने स्वतःच्या गाण्यांच्या "षोक"ला सांगितिक वाटचाल म्हणणे म्हणजे, असू द्या.. "गांडूळ-शेषनाग, उंदीर-ऐरावत" ह्या चांगल्या उपमा पुलंनी आधीच वापरल्याने मी काही नवीन उपमा देणे म्हणजे, राम गोपाल वर्माने "देवदास"चा रिमेक केल्यासारखे होईल.

मला कळायला लागल्यापासून घरात रेडिओ असल्याने, रेडिओवरची गाणी हा एक अविभाज्य भाग आहे. आणि तो आजतागायत आहे. फक्त माझा आणि रेडिओचा आकार व्यस्त प्रमाणात बदलत राहिला. रेडिओ आधी मोठ्ठा होता, मग ट्रान्झिस्टर, पॉकेट रेडिओ व आता मोबाईल ऍप पर्यंत छोटा झाला. आणि माझा आकार.. असू द्या.

हल्ली जसा घरोघरी टीव्ही असतो तसा पूर्वी रेडिओ असायचा. हा काळ १९७८ ते ८८ मधला आणि गाव नंदुरबार. मुळात दादांना हिंदी फिल्मी गाणे खूप प्रिय होते. माझे असं अवलोकन आहे की, आपल्याला आपल्या तरुणपणी गाजलेल्या गाण्यांपेक्षा आपण बाल्य अवस्थेत असताना आलेली गाणी जास्त आवडतात. दादांचे तसेच काहीसे असेल. त्यांना १९५० ते ६० च्या दशकातील गाणी आवडायची. रेडिओला पूर्वी फार काही पर्याय नव्हते, जे पदरात पडेल ते गोड मानून घ्यायचे. दादांचे आवडते जुने गाणे सुरुवातीला कंटाळवाणे वाटायचे, पण नंतर ते आवडू लागले.

दादांमुळे आणि रेडिओमुळे आम्हाला अमुक गाणे अमुक सिनेमातले, विशेष करून पडद्यावरचे कलाकार कोण होते हे कळले. दादांचे आवडते कलाकार म्हणजे राजकपूर, गुरुदत्त, दिलीपकुमार हे.
रेडिओमुळे संगीत क्षेत्रातील कलाकार कळू लागले. गायिका आहेत - लता मंगेशकर, संगीतकार - शंकर जयकिशन. उर्दू सर्व्हिस वाले - नगमानिगार है हसरत जयपुरी, असले सामान्य ज्ञान बालपणी प्राप्त झाले.
आम्हा भावंडाना तेव्हाची नविन गाणी रेडिओ वाजली की मजा यायची. पण रेडिओ वाल्यांचा असा काही नियम असावा की गाणं चांगलं ४-५ वर्ष जुनं झालं, छान लोणच्या सारखं मुरलं की मगच ते रेडिओवर वाजवायचं. 
आता त्यातली काही ऐकली तर आपण का ही गाणी सहन केलीत?  असा प्रश्न पडतो. उदा. "ओ देवी श्रीदेवी, तू नही"..वगैरे.
ह्यातली बरीच (आता टुकार वाटतात) गाणी जितेंद्रच्या पिक्चर मधली असायची.
अमिताभच्या पिक्चरला ऍक्शन जास्त असली तरी गाणी चांगली असायची. नशिबाने, तेव्हाची बरीच गाणी RD बर्मनची सुद्धा असल्याने ती गाणी तेव्हाच काळाच्या पुढची होती. 

दादा दर बुधवारी न चुकता "बिनाका गीतमाला" रेडिओ सिलोनवर ऐकत. बिनाकामध्ये फक्त नविन गाणी वाजविली जायची त्यामुळे आम्हीही ते आवडीने ऐकायचो. शॉर्ट वेव्ह रेडिओला तेव्हा २-३ मिनिटे प्रयत्न केला की स्टेशन ट्यून व्हायचे. मधेच एखादे स्टेशन पकडले जायचे जिथे अरबी किंवा फारशी भाषेत बातम्या सुरू असायच्या. 

बिनाकाचे सर्वेसर्वा अमीन सायनी यांना आम्ही "बैनो भय्यो" म्हणायचो. बिनाकाचा वार्षिक कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच असायची. डिसेंबरच्या शेवटच्या दोन बुधवारी तो असायचा. आम्हाला उत्सुकता असायची की ह्या वर्षी कोणते गाणे पहिले येणार. टीव्ही नसल्याने नवीन वर्षाचे "रंगारंग" कार्यक्रम तेव्हा आमच्या नशिबी नव्हते. 

संजय सोनार
(क्रमशः)

Thursday, 19 March 2020

सांस्कृतिक बदलाची नांदी


सांस्कृतिक बदलाची नांदी 

सध्या सर्व जगात कोरोना मुळे घरी आणि दारी एक "नजर कैद" निर्माण झाली आहे . "जग हे बंदिशाला" ह्याचा खरा अनुभव आता येतोय.
पाश्चिमात्य देशात "खाजगीपणा" किंवा एकमेकांना "स्पेस" देणे वगैरे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यांच्या संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. पण आपल्या भारतासारख्या देशाला जिथे "साधन" पासून ते "साधना" पर्यंत पदोपदी माणूस समाजात मानसिकरीत्या गुंतला आहे, तिथे अलिप्त राहणे हि एक शिक्षा आहे.

आता मात्र जेव्हा हे बंधन क्रमप्राप्त आहे, तेव्हा हा "खेळ" किती दिवस चालेल ह्यावर बरेच काही अवलंबून आहे. एक-दोन आठवड्यात जर परिस्थिती पूर्ववत झाली तर शेअर मार्केटच्या ग्राफ प्रमाणे एक मोठा "खोल" स्पाईक आपल्या आयुष्यात दिसेल. परंतु, हे जास्त दिवस चालले तर कदाचित आपल्या सवयी बदलतील, आवडी-निवडी, परस्परांकडे पाहण्याचा दृष्टिकोन असे बरंच काही बदलेल. आत्ताच आपण एकमेकांकडे संशयाने बघत आहोत.

आपल्या कडे लहान मुलांना कारमध्ये "कार-सिट" शिवाय जाणे, पुढील सीटवर बसणे ई. अगदी सामान्य आहे. मात्र काही देशात उदा. अमेरिकेत "कार-सिट" अनिवार्य आहे, नाहीतर दंड भरावा लागतो. ह्या प्रमाणे सध्या आपण जे "बिनधास्त" आयुष्य जगतो त्याला मर्यादा येतील, किंबहुना आपण स्वतःहून त्या मर्यादा घालू.

हे सगळे खरेअसले तरी "गरज" माणसाला सगळं काही शिकवत असते. पुन्हा काही दिवसांनी आपण आपण पूर्वपदावर येऊ. पण, मधल्या काळातील ह्या "बंदिशाळे" मुळे, कुठेतरी सांस्कृतिक (cultural) बदलाला सुरुवात झाली असेल.

संजय सोनार
१९-मार्च-२०२०