Original post date - 11 March 2010
इयत्ता तिसरीला इतिहासाचे म्हणून आम्हाला "थोरांची ओळख" नावाचे पुस्तक होते. पहिला धडा दादाभाई नवरोझी यांचा होता. सर्व थोर पुरुषांचा अल्प परिचय त्यात होता. सरदार वल्लभ भाई पटेल यांनी स्वतःची गाठ कशी काढली? लाल बहादूर शास्री लहान असतांना अनवाणी शाळेत जायचे. गांधीजी यांची हत्या एका माथेफिरू ने केली.. हे सगळे मला अजूनही आठवते.
जस-जसे आपण मोठे (वयाने) होतो, तस-तशी आपली अक्कल नको तितकी वाढत जाते. आणि तीही अपूर्ण! Half knowledge is more dangerous म्हणतात ते खोट नाही. (अजूनही पूर्ण शहाणपण आले आहे, असा माझा दावा नाही!)
साधारण पणे जुनियर कॉलेज च्या वयात आम्हाला गांधीजी यांनी कसे भारताचे नुकसान केले..आणि नथुराम गोडसेच कसा भारी.. वगैरे सांगण्यात आले.. आणि मग पुढे जाऊन त्यांचे सत्याचे प्रयोग.. एकूण बर्याच अफवा/अर्धसत्य ऐकून एक मत तयार झाले..
गांधीजी आणि नेहरू यांच्या नावाने कॅन्टीन वर बसून बोटे मोडणे हे सर्व प्रकार सुरु झाले..
पुढे काही दिवसांनी शिवाजी महाराजांबद्दल (ज्यांच्या नावे पूर्ण ४ थी ते १० वी आम्ही गाजवली) काही खसखस पिकू लागली.. कि म्हणे त्यांनी बरीच लग्न केलीत.. असा काळ कि ज्यात दोन लग्न केलेली म्हणे आम्हाला खलनायक म्हणून पहायची सवय.. इथे असले काही कळल्यावर जीवाची उलघाल होणारच!
पुढे तसेच काही मग भगवान कृष्ण ते वीर सावरकर यांच्या पर्यंत ऐकले..
आता जेव्हा डोक्यावरचे पांढरे झाले.. अस वाटतंय कि आपण कुठल्या हक्काने ह्या इतक्या महान लोकांबद्दल आपले मत ठोकून दिले? एक-दोन वर्ष नाही तर त्यांनी उभे आयुष्य आपल्या कार्यासाठी वाहून दिले.. गांधीजी असोत कि सावरकर .. प्रत्येकाचे योगदान अतुल्य आहे!
त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यात काय केले याचा हिशेब मांडणारे आपण कोण? तुम्ही आम्ही काय कमी चुका केल्यात आयुष्यात.
वास्तविक पाहता ह्या महान लोकांची ताकत आणि प्रसिद्धी पाहता, त्याचा उपयोग ते स्वतःच्या स्वार्थासाठी करू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मुघलांची चाकरी स्वीकारली असती आणि आरामात आयुष्य काढायचे ठरवले असते तर काय हाहाकार माजला असता हे सांगायची गरज नाही. महाराष्ट्रासाठीच नव्हे तर पूर्ण भारतासाठी त्यांचे योगदान अनमोल आहे.
विधायक पद्धतीने स्वातंत्र्याचा लढा चालवणारे गांधीजी, काळ्या पाण्याची शिक्षा अनुभवलेले वीर सावरकर, पंतप्रधान पदाची धुरा सांभाळत लोकशाहीची मुळे रुजवणारे नेहरू... सर्वच आपल्या थोर पणासाठी पात्र आहेत.
दुर्दैव असे कि लहानपणी थोर असलेल्या ह्या महान लोकांबद्दल अजूनही आपल्या पैकी काही जणांचे मत कॉलेजवरील कट्ट्यावरच्या गप्पांनी प्रेरित आहे. आपल्याला पुन्हा एकदा गरज आहे "थोरांची ओळख" करण्याची.
संजय सोनार
No comments:
Post a Comment