Tuesday, 1 September 2020

माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल - किशोर वय

माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल

भाग ४ - किशोर वय


१९८७ चा काळ माझ्यासाठी खूप वेगवान होता. नववी संपून दहावी सुरू होणार. 
अशात आम्ही घर बदलले होते. शाळे जवळ जरा मोठे घर होते. बाजूलाच शाळेतला मित्र राहत होता, नितेंद्र. नित्याचा भाऊ जितू धुळ्यात कॉलेजात होता. सुटीत घरी यायचा तेव्हा नवीन गोष्टी शिकायला मिळत. उदा. शम्मी कपूरचे गाणे, शम्मी कपूरचा नाच, देव आनंदची गाणी. जितू देखील आमच्या सारखा "फिल्मी" होता. 
अश्यात त्याने एकदा आनंद शिंदेची कॅसेट आणली "नवीन पोपट हा".. आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे. एकदम वरच्या पट्टीचा आवाज, अगदी प्रल्हाद शिंदेंसारखा. जितू पुढच्या सुटीवर आला तेव्हा नवीन कॅसेट "आंटीची घंटी वाजवली". नंतर ८८ मध्ये जेव्हा "कयामत से कयामत" आला, त्याचे संगीतकार "आनंद-मिलिंद". मला वाटले, अरे आपले आनंद शिंदे, मिलिंद शिंदे. नंतर कळले की ते चित्रगुप्तचे मुलं आनंद-मिलिंद. बहुदा "मायापुरी" मध्ये वाचले असणार. आमचा चक्कीवाला मायापुरी ठेवायचा म्हणून दळणाचे कधी "ओझे" वाटले नाही. 
नवीन पोपटची क्रेझ इतकी वाढली होती की किशोरकुमारने हिंदी मधले गाणे गायले - मैं तेरा तोता, तू मेरी मैना.. :)

आप्पा तेव्हा ११वी ला होता. तेव्हा VCR आणून घरी TV वर (अर्थात ज्यांच्या कडे TV आहे तिथेच) पिक्चर पाहण्याची पद्धत होती. VCR चे दिवसाचे भाडे ठरलेले असायचे. मग दिवस भरात एका-मागून एक पिक्चर पहायचे. आपाच्या एका मित्राकडे अशीच movie night (हा आत्ताचा शब्द आहे) होती. मीही सोबतीला होतोच. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफचा "धुमधडाका" तेव्हा पाहिला. एकदा नाही दोनदा तेही लागोपाठ. जसं आता माझ्या मुलांना "ये तेजा तेजा क्या है?" हे माहिती आहे पण "ये इलू इलू क्या है?" हे माहीत नाही, तसंच मला "सच है दुनिया वालो के हम है अनाडी" ह्याच्या पूर्वी बेर्डेने धुमधडाका मध्ये म्हटलेले "सच है दुनिया वालो मेरे पप्पा हैं अनाडी" हे माहीत झाले.
 तसेच पॅरोडी गाण्याची ओळख पण नव्याने झाली. एका चालीवर दुसरे गाणे, शिवाय नकला. सर्व नवीन असल्याने खूप मजा वाटायची. नंतर Mr India मध्ये देखील असे गाणे आले. आणि पुढे जाऊन महेश कोठारेंनी तर पॅरोडी अति वापरून त्यातली गम्मतच घालवली.

आप्पाच्या मित्रांमुळे त्याला जुन्या पिक्चर बद्दल नवीन गोष्टी कळत होत्या, त्या निमित्त मला देखील. उदा. राजेंद्र कुमारचा आप आए बहार आयी, हा कसा musical hit आहे.

ह्या दिवसात TV वर (अर्थात आमच्याकडे नव्हताच) फक्त रविवारी दूरदर्शनवर पिक्चर यायचा. पण अँटिना नव्हता आणि घरोघरी केबल असल्याने, दर बुधवारी केबलवरून नवीन पिक्चर दाखवले जात. कधी ह्या मित्राकडे तर कधी त्या मित्राकडे जाऊन आम्ही न चुकता ते बघत असू. दहावी सुरू झाल्यावर मात्र गल्लीतच कुठेतरी नंबर लावत असू. तो पर्यंत TV वाली घरं वाढली होती. ह्या नादामुळे खूप गाणी कानावर पडली. बरीचशी अल्पजीवी अशीच होती. तो काळ मद्रासी पिक्चरचे हिंदी करण्याचा होता. यश चोप्रा, सलीम-जावेद, अमिताभ, RD सगळ्यांच्या कलाकृती ८६-८८ मध्ये थंडावल्या होत्या. ८७ साली इजाज़त आला होता, पण त्याची गाणी कळण्याचे वय नव्हते.

पिक्चरला शह द्यायला आता TV वर सिरीयल सुरू झाल्या होत्या. रामायण आणि बुनियाद आठवतात. बाकीही असतील पण त्यांना आमच्या सारखा रसिक प्रेक्षकवर्ग लाभला नाही.
८७ च्या ऑक्टोबर मध्ये बातमी आली की किशोरकुमार गेला. मला खूप वाईट वाटले. किशोरकुमारने आमचे बालपण व्यापले होते. किशोरकुमार आधी ऍक्टर होता हे दादांनी सांगितले होते, पण त्याचे पिक्चर पाहण्याचा योग आला नव्हता. पहिला किशोरकुमारचा पिक्चर पाहिला तो दूरदर्शनवर, तोही किशोरकुमार गेल्यामुळे दाखवला असेल. तो होता "चलती का नाम गाडी". पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवले की किती लाजवाब कलाकार होता हा! (तरी पडोसन, हाफ टिकीट अजून पाहिले नव्हते).
गाणे ऐकताना आता शब्द, अर्थ (कळेल तितका) जाणून घेत होतो. "नाम"चे चिट्ठी आयीं हैं, खुदगर्जचे जिंदगीका नाम दोस्ती, मि इंडिया चे जिंदगीकी ये ही रीत हैं.. हे शब्दांमुळे आवडले होते. 

आता कॅसेट रेकॉर्ड करायची सोय नंदूरबार मध्ये होती. मग पहिली कॅसेट रेकॉर्ड केली ती ८८ च्या मध्याला. एव्हाना आप्पा डिप्लोमा साठी शहाद्याला होता. त्यामुळे माई (बहीण) आणि मीच यादी बनवली. एक नंबरवर होते ते मिस्टर इंडियाचे पॅरोडी गाणे, मग मैं तेरा तोता, "विजय" पिक्चरचे एक गाणे, तुमसे बना मेरा जीवन, शहेनशहा,असे काहीतरी. बाकीची गाणी आठवत नाहीत. पण तो पर्यंत "कयामत से कयामत तक" पाहिला नव्हता आणि गाणीही फार गाजली नव्हती. माझ्या पुरता तरी अजून हिंदी गाण्यांचा तो नवीन काळ यायचा बाकी होता.

क्रमशः

संजय सोनार

माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल - कॅसेट युगाची हवा

माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल

भाग ३ - कॅसेट युगाची हवा


पुन्हा थोडे मागे जातो. जेव्हा कॅसेटचे युग होते तेव्हा काही गैर-फिल्मीही कानावर पडले. "मैय्या मोरी मैं नहीं माखन खायो", अनुप जलोटा यांची ती गाजलेली कॅसेट शेजारच्या मावशीं कडे होती. श्वास धरून अनुप जलोटा कसे "ऐसे लागी…....…. लगन" म्हणायचे. तेव्हा कळले की गायकीत अश्या "हरकती" घेतल्यास "हरकत" असते. एकदा अनुप जलोटा आणि पुरुषोत्तम जलोटा यांचा कार्यक्रम होता नंदुरबारला व आम्ही सहकुटुंब गेलो होतो. 

 बाबासाहेब देशमुख यांचा तानाजीचा पोवाडाही तेव्हा कॅसेटवर ऐकला. गम्मत म्हणजे मला तेव्हा बाबासाहेब पुरंदरे माहीत नव्हते, आमच्या साठी "हरी तात्या" म्हणजे बाबासाहेब देशमुख ! 
पिराजीराव सरनाईक यांच्या पोवाड्याची कॅसेट होती. शिवाय जॉनी लिव्हर यांची हसी के हंगामे देखील तेव्हाच कानावर पडली. हे सगळे गद्य झाले, गाण्याचे म्हणाल तर अजून एक गाजलेली कॅसेट होती, पाकिस्तानी गायक हसन जहांगीरची - "हवा हवा ए हवा". ह्याची इतकी हवा होती की, गणपतीच्या कार्यक्रमात पण ह्याची फर्माईश होत असे, आणि त्यावेळी कोणाच्या भावना देखील इतक्या नाजूक नव्हत्या किंवा तसे असण्याचे काही कारण नव्हते. असो.

ह्यातल्या बऱ्याच कॅसेट उसन्या आणलेल्या असायच्या. काही ठिकाणी बदल्यात आपली एक कॅसेट गहाण असे. HMV नावाची एक कंपनी आहे आणि HMV च्या कॅसेट ओरिजिनल असतात, ह्याचा साक्षात्कार होण्याआधी आमच्या साठी "जय मातादी" लिहिलेल्या T-series (बापरे मोठ्ठा विषय आहे हा) सबकुछ होते.

दादा कोंडके ह्यांच्या LP रेकॉर्डस् त्यावेळी लग्नात हमखास वाजवल्या जात. फिल्मी डायलॉगच्या देखील कॅसेट बाजारात येऊ लागल्या होत्या. आली अंगावर, बोट लावीन तिथे गुदगुल्या, ह्यांच्या निवडक संवादाची एक कॅसेट होती. शोलेच्या डायलॉगची कॅसेट मात्र तेव्हा मिळाली नाही (नंतर ८९-९० मध्ये मिळाली). तरीही शाळेतून येतांना, एका रसवंती वाल्याकडे शोलेची कॅसेट चालू असायची. ती ऐकून पाठांतर व्हायचे.

मामाकडे असतांना एका मावस भावाने "गाढवाचे लग्न"ची कॅसेट ऐकवली. आता कळाले की तो महान कलाकार "दादू इंदुलकर" होता.

८६ च्या उन्हाळ्याच्या सुटी मोठा भाऊ (आप्पा) मुंबईला काकांकडे गेला होता. येतांना त्याने काही कॅसेट आणल्या होत्या, त्यातली एकच लक्षात आहे ती म्हणजे शाहीर साबळे यांनी "बापाचा बाप". ह्या कॅसेटचे इतके पारायण केले होते की आम्ही आमच्या गल्ली ऑर्केष्ट्रा मध्ये हे वगनाट्य बसवले, फक्त कॅसेट ऐकून. 

ह्याच वेळी video नावाचे थैमान सुरू झाले. नंदुरबारला काही नवीन पिक्चर २-३ महिने उशिरा यायचे. Video मुळे नवीन पिक्चर लगेच येऊ लागले. जितेंद्र आणि मिथुन यांचे तेव्हा मद्रासला स्थलांतर झाले होते आणि अमिताभचे दिल्लीला!

Video आणि T-series च्या काळाआधी, जसे दहावीनंतर आर्ट्स,कॉमर्स आणि सायन्स (पळसाला पाने तीन) असे होते, त्याच प्रमाणे गायक म्हटले की रफी, किशोर, लता, आशा.. बास! तोंडी लावायला शैलेंद्र सिंग, येशूदास, सुरेश वाडकर, अलका याज्ञीक (मेरे अंगनेमे) इत्यादी. 

नंतर मात्र नवनविन कलाकारांचा सुळसुळाट आला. शब्बीर कुमार (बेताब), मोहम्मद अझीझ (मर्द), कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, मनहर उदास. संगीतकरांमध्ये मात्र फार कुणी आले नाही. लक्ष्मी-प्यारे यांचे राज्य चालू होते. बरेच लोक लक्ष्मी-प्यारे यांना LP म्हणतात. LP रेकॉर्ड प्रमाणेच, संगीतकार LP हे "लॉंग प्लेइंग" असेच होते. बप्पी लहरी (आधी पासून होतेच) ह्यांचा अंगावर अजून थोडे दागिने वाढले होते. अन्नू मलीक हा एक नवीन संगीतकार मात्र आला होता, सोहनी महिवाल द्वारे.

काही गाणी Sp बालसुब्रमण्यमची (मैने प्यार किया च्या आधी) होती. कमल हसनसाठी एक दुजेके लिये पासून सागर पर्यंतची गाणी. शिवाय, एक ही भूल मधले "हे राजू , हे डॅडी" आणि रास्ते प्यार के मधले "मैं तुम मे समा जाऊ" हे लक्षात आहेत.

इतके गायक गायिका माहीत असले तरी गाण्यात "लता आहे की आशा" हे ओळखण्या इतके प्रभुत्व आले नव्हते. तिच गत मन्ना डे, महेंद्र कपूर आणि रफी यांच्या बाबतीत. मुकेश, सलमा आगा, असे सोपे प्रश्न सोडवू शकत असे. 


संजय सोनार

क्रमशः