चाळीसीतले चोर
दि. १९ फेब्रू़. २०१८
संजय सोनार
बऱ्याच दिवसांनी लिहीत आहे! लिहिण्यासाठी उत्तेजित (Provoke) केल्याबद्दल ऑफिसमधल्या मित्रांचे आभार!
पूर्वीची एक पिढी होती, ज्या पिढीने खूप कष्टाने पारंपरिक व्यवसाय सोडून, गाव-शिव सोडून शहराची वाट धरली. मुलांना शिकवले, बरेच दिवस भाड्याच्या घरात राहिल्यानंतर छोटे का होईना पण स्वतःचे घर घेतले. ह्या पिढीला त्यांच्या आधीच्या पिढीचा एक धाक होता, पण तो मूळ गावाला असे पर्यंत मर्यादित असायचा. शहरात ह्यांचीच मर्जी असायची. गावाकडे एकत्र कुटुंब, बरेच भाऊ-बहीण असलेली हि पिढी होती. तेव्हाच्या जीवनशैलीमुळे म्हणा किंवा रूढी परंपरेने ह्या पिढीचे आई वडील ह्यांच्या सोबत शहरात फार राहिलेले नसत.
पण हि कथा (व्यथा?) ह्या पिढीची नसून त्यांच्या नंतरच्या पिढीची आहे. साधारणपणे १९७० च्या दशकात जन्मलेली हि पिढी! हे लोक, सध्या ढोबळपणे ३९ ते ४८ ह्या वयोगटात आहेत.
ह्या पिढीने (आमची पिढी म्हणायला हरकत नाही कारण मीही त्यातच एक आहे), आमच्या पिढीने खूप काही खडतर असे बालपण अनुभवले नाही, पण चंगळवाद मात्र वयाच्या २०-२५ वर्षापर्यंत आम्हाला शिवला नाही. समाजातील वेगवेगळ्या मित्रांसोबत वाढलेलो, शाळा-अभ्यासा व्यतिरिक्त इतर बरेच उद्योग केलेले आम्ही. गणपती असो वा रंगपंचमी, क्रिकेट असो वा लपाछापी सगळं काही भर-भरून खेळत, एका चाकोरीत सापडलो नाही. किंबहुना काही लोक आम्हाला "एक न धड भाराभर चिंध्या" असेही म्हणत असतील. इंग्रजीत ज्याला "Jack of all trades" म्हणतात तसं काहीतरी आहे आमचं. आणि म्हणूनच आम्हाला गप्पा मारायला अगणित विषय असतात.
आम्ही जर गप्पांसाठी एकत्र आलो तर त्या गप्पांचा संग्रह एक मनोरंजक आणि "बोधप्राय" असे साहित्य निर्माण होऊ शकते. शेअर मार्केट, विमा, आरोग्य, इत्यादी पासून ते क्रिकेट, राजकारण, सिनेमा, संगीत सगळीकडे आमचा वावर असतो. आमच्यातले काही दर्दी मित्र शास्रीय संगीत, कविता, योगा आणि विशेष करून "Diet"वर भर-भरून बोलू शकतात. आमच्याकडे, प्रत्येकाकडे किमान ४ ते ५ बिजनेस आयडिया असतात. मग कधी चहाच्या कट्ट्यावर तर कधी कारपूल करतांना आम्ही हे सर्व विषय चघळतो.
मुलांना कुठल्या क्लासला घालावे, कुठली कार चांगली?, घर घ्यावे कि दुकान?, कुठला stock सध्या जोरात आहे? Income Tax कसा वाचवावा?, कुठले हॉटेल चांगले?.. पासून ते पार.. पोट कसे कमी करावे, काय केल्याने गेलेले केस परत येतात, वगैरे वगैरे.
आमच्यातल्या बर्याच जणांना किशोरकुमार आणि RD बर्मन ह्यांची गाणी नुसती आवडत नाहीत तर तोंडपाठ आहेत. रिमिक्स बद्दल आमचे मत फार चांगले नाही, हल्ली रिमिक्स ऐकण्यापेक्षा बघायलाच बरी वाटतात. असो.
आमच्या पिढीला देवाने भरभरून दिले. स्वच्छंदी असे बालपण, चांगले शिक्षण, आर्थिक स्थैर्य आणि ह्याच बरोबर खूप साऱ्या जवाबदाऱ्या! आधीच्या पिढीच्या आणि पुढच्या पिढीच्या सुद्धा.
एकाच दिवशी आम्हाला मुलांसाठी आणि आई-वडिलांसाठी वेळ द्यावा लागतो. मुलांचे शाळा-क्लासनाहीतर काहीतरी खरेदी.. आणि आई-वडिलांचे चेक-अप, दवाखाने नाहीतर कोणाच्या गाठी-भेटी. मनातल्या मनातबरेच छंद जोपासत, आमचे सगळे नवीन संकल्प"उद्यापासून" असतात. सक्काळी उठून जॉगिंग, तबलाकिंवा हर्मोनिअमचा क्लास, एखादे छान पुस्तक(प्रदर्शानतून घेतलेले) वाचणे, झालंच तर एखादे मनमोकळेलिखाण (जे आत्ता चालू आहे). ह्यातील काही संकल्पहोतात पूर्ण पण बरेचशे "राहून गेलेल्या गोष्टी" ह्या सदरातमोडतात.
आमच्यातले काही भाग्यवान, नियमितपणे व्यायाम, वीकेंडला ट्रेक नाहीतर कुठल्याश्या मॅरेथॉनला धावायलाजातात. काही सामाजिक प्राणी (social animal) सततकुठल्यातरी ग्रुपच्या गेट-टुगेदरला रिसोर्टमध्ये पडीकअसतात. खरंच, अतिशय हेवा वाटतो त्यांचा! पहिला मुद्दाह्यांना घरून परवानगी मिळतेच कशी? आम्हाला इथेमुलांच्या क्लासेस आणि प्लंबिंग-वायरिंग, गाड्यांचेसर्विसिंग ह्यामधून वेळ मिळालाच तर शॉपिंग (कपडे नाहीकिराणा सामान) आणि शिवाय TV वर कुठलीतरी मॅचअसतेच नाही म्हणायला. अश्या भाग्यवंत लोकांच्याघरच्यांचे खरंच कौतुक आहे. कारण आपल्या वाटचा वेळअसा सहज दान करण्यासाठी खूप मोठे मन लागते.
राजकारकाबद्दल आमची पिढी म्हणजे सतत -"सत्ते विरुद्ध" लढा सुरु ठेवणे असे काहीतरी करत असते. ह्याला कारणकदाचित आमचा जन्म आणीबाणीच्या काळातला म्हणूनअसेल किंवा, आमचे मत अमिताभ बच्चनचे सिनेमे पाहूनआणि बाळासाहेबांसारख्या नेत्यांची भाषणे ऐकून तसेझाले असेल. लोकपाल आंदोलन असो, आम आदमीपक्षाला एक संधी देणे असो किंवा "नमोमय" भारताचाउदय असो - मला वाटते कि ह्यात आमच्या पिढीचा ४०% वाटा सहज असेल. आणि भविष्यात "नमों"चे नामोहरमझाले तर ते देखील आमच्या मुळेच असेल.
कॉर्पोरेट क्षेत्रात आमची पिढी; किंबहुना कुठल्याही काळात४० ते ५० असलेली पिढी; हि सर्वात कार्यक्षम, कंपनीचेताळेबंद (balance sheet) ठरवणारी असते. म्हणूनचआमचा पगार गब्बर असतो. पण आम्ही जे मोबदल्यात देतोते खूप जास्त देतो. आणि आमच्यातल्या काही "चोरांची" नियत बिघडली तर कंपनीचे वाटोळे सुद्धा होऊ शकते. साधारणपणे आपण म्हणतो कि, लहान मुल सर्वात भोळे (उर्दूत मासूम ज्याला म्हणतात असे) असतात. असोत बापडे! पण ह्याच मापात आपण सर्वात चलाख (पुन्हा उर्दूत शातीर) कुठला वर्ग असेल असा विचार केला तर "चाळीसी" असे मला वाटते. ह्या लोकांनी आधीच इतके धक्के पचवलेले असतात कि त्यांना सहज कोणी गंडवू शकत नाही.
वयाच्या ह्या वळणावर अचानक जुने मित्र (आणि मैत्रिणी) आठवू लागतात. आपण इतरांपेक्षा मागे पडत जातोय किकाय? आपल्याला बरेच रन करायचे आहेत आणि खूपकमी बॉल शिल्लक आहेत, असा साक्षात्कार होतो. एकप्रकारचा स्वार्थ जागृत होतो. जीवन हे सारं असार आहे, असे वाटत असताना मनात कुठेतरी हा "चाळीसीचा चोर" कमी वेळात जास्त सुख ओरबाडण्यासाठी संधी शोधातअसतो. १००+ च्या वेगात चाललेल्या ह्या चोराच्या गाडीलाअचानक ब्रेक लागतो, जेव्हा त्याचाच जवळचा मित्र किंवासहकारी अचानक सोडून जातो. मोठ-मोठे प्लांनिंग सर्वकागदावर राहून जातात. काही दिवसांनी गाडी पुन्हा वेगधरते. मग पुन्हा आपल्या जुन्या मित्रांना घेऊन गप्पांचेगुऱ्हाळे चालू ठेवत, ह्या "वाल्या"चा हळू हळू "वाल्मिकी" होतो.
त्यानंतर त्याचे काय होते? त्याला काय करावेसे वाटते? हेसर्व लिहीन पण काही वर्षांनंतर! तो पर्यंत - जब मिलेथोडी फुर्सत, खुदसे करले मुहोब्बत!!