राजकारणी लोकांचा निर्लज्जपणा आपण उघड डोळ्याने पाहतो, पण आपल्याला त्याची इतकी सवय झाली आहे कि आपण दुर्लक्ष करतो..
सामान्य माणसं काही वय्यक्तिक आनंद झाला (लग्न(?), नवीन मूल जन्मले वगैरे) कि तो फटाके, ब्यांड, नाच इत्यादीने साजरा करतात. तसाच किंवा त्यापेक्षा दसपट जोशात राजकारणी लोक आपला विजय "celebrate" करतात. कशासाठी?
नगरसेवक (सेवक हा शब्द महत्वाचा), आमदार, खासदार या लोकांचा अधिकृत पगार हा तुमच्या आमच्यापेक्षा नक्कीच कमी असतो. पण मग तरी दिवसा ढवळ्या हे लोक का म्हणून जल्लोष करतात? त्यांना असे वाटते का कि आता मी जिंकलो आता मला ५ वर्ष अधिकाराने पचेल तेवढा पैसा कमावता येईल? कि मी आता सर्वांवर हुकुम चालवू शकतो? काही तरी मोठ्ठ घबाड मिळाल्याचा आनंद त्यांना होत असतो.
बातम्या पण आपण कश्या देतो.. "अमक्या पक्षाचे ७०% नगरसेवक निवडून आले. आता सत्ता ह्या पक्षाकडेच येणार". सेवकांच्या हाती सत्ता? हा विरोधाभास आपल्या लक्षात कसा येत नाही?
मत मागतांना पण हे लोक "माझा काहीतरी फायदा करा" ह्या अर्थानेच मत मागतात. हे सर्व आपण सहन करतोय कारण आपली ताकत, अधिकार आपल्याला माहित नाहीत.
मला खूप दिवसांपासून काही प्रश्न पडले आहेत.. तुम्हा कोणाला उत्तर माहित असेल तर अवश्य लिहा. माझं राज्यशास्त्र कच्चं आहे.
१. नगरसेवकाची कर्तव्ये काय असतात?
२. रस्त्यात खड्डे आहेत. तक्रार कुठे करावी?
३. जर महापौर आहेत, तर शहरासाठी आमदार का असावे लागतात?
४. सर्वच कामासाठी सरकारी कर्मचारी (बाबू लोकं) आहेत. तर मग लोकं प्रतिनिधी काय फक्त सह्या करण्यासाठी असतात का?
५. तुम्हाला पण असे प्रश्न पडतात का?
संजय सोनार