Thursday 27 August 2020

माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल - टेप रेकॉर्डरचे राज्य

माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल

भाग २ - टेप रेकॉर्डरचे राज्य


साधारण १९८४ च्या आसपास टेप रेकॉर्डर आणि कॅसेटचा उदय झाला आणि एक नवीन जादूचे खेळणे हाती पडावे असे आमचे झाले.
आपल्या आवडीची गाणी, पाहिजे तेव्हा, कितीही वेळा ऐकता येणार! अर्थात त्याआधीही LP रेकॉर्डस् आणि ग्रामोफोन होतेच. पण मध्यम वर्गाकडे ते नव्हते आणि छोट्या शहरात तर एक-दोन बड्या असामींकडे तसे ग्रामोफोन असतील. कशी गम्मत आहे पहा, नावात "ग्राम" आहे, पण वस्तू फक्त महानगरासाठी!

सर्वात आधी टेपरेकॉर्डर आम्ही मामाकडे असतांना, माझे पुण्याचे मावसा यांनी आणला. आम्ही सुद्धा हट्ट करून दादांना टेप घ्यायला लावला. 
आमच्या शाळेसमोरच्या एका सिंधी माणसाच्या दुकानात, सोनीटोनचा टेप आम्ही ऑर्डर करून ठेवला होता. तो स्टॉक मध्ये नसल्याने, बरेच दिवस आम्ही रोज जाऊन विचारायचो "सोनटोनका टेप आया क्या?". :)
आणि शेवटी टेप आमच्या घरी वाजत-गाजत आला.

सुरुवातीला आमच्याकडे ज्या कॅसेट होत्या त्या बऱ्याच दादांच्या आवडीच्या होत्या. चोरी-चोरी-आवारा, नया दौर-मधुमती, श्री४२०-आह, तेरे घरके सामने ई. काही दिवसांनी मग आम्ही देशप्रेमी-नमक हलाल, कर्ज-कुर्बानी असल्या कॅसेट आणल्या. मराठीच्या नावाने फक्त पहाटेची भक्ती गीते आणि प्रल्हाद शिंदे!
एव्हाना, गाणी म्हणजे फक्त हिंदी पिक्चरची.. झालंच तर मराठी गाणी रेडिओवर वाजली तीच. नंदुरबार मध्ये मराठीपेक्षा हिंदी पिक्चर जास्त चालायचे. आणि TV नसल्याने मराठीच्या एका मोठ्या खजिन्यापासून मी वंचित होतो. 
मराठी भावगीते यांचा तर गंधही नव्हता. आता कळते की बालभारतीच्या पुस्तकातल्या बऱ्याच कविता "भावगीत"च आहेत. शाळेत संगीत शिकवणाऱ्या बाईंमुळे साने गुरुजी, सावरकर यांच्या गीतांशी ओळख होती.
एकदा दादांच्या ऑफिस मधले एक सर घरी आले होते. त्यांच्या मुलाने "सुधीर फडकें"ची कॅसेट दिली. काही दिवस ऐकायला. मुळात माझ्या दुर्दैवाने मला सुधीर फडके माहीत नव्हते. काही दिवस कॅसेट ऐकली पण "आपल्या type ची नाही" म्हणून परत केली.
तेव्हा आमची आवड म्हणजे "चल मेरे भाई तेरे पाव पडता हू".. अशी होती.
आमच्या शेजारी भरत नावाचा एक होतकरू तरुण राहत होता. तो कॉलेज वगैरे झाला असेल किंवा त्या वयाचा होता. त्याच्याकडे असलेले collection भारीच होते. मोहम्मद रफीचा तो भक्त होता. आम्हाला मात्र किशोर कुमार सोडून काही कळायचे नाही की आवडायचे नाही. 
आमच्या गल्लीत आम्ही गोकुळाष्टमीच्या जागरणासाठी "ऑर्केष्ट्रा" बसवला होता. आमची ऑर्केष्ट्राची व्याख्या म्हणजे खऱ्या अर्थाने गाणी-नाच, एखादे नाटक. भरतची मदत घेऊन आम्ही गाणी बसविली. त्याने गाणे लिहून देखील दिले. माझ्या भावासाठी (आप्पा) "ये दुनिया ये महफिल", माझ्यासाठी "खिलौना जानकर"..:) त्याचा आयुष्यातला "दर्द" त्याने आमच्या करवी पेश केला होता. 
भरत कडून अजून एक गोष्ट कळली ती म्हणजे "बुलबुल" (बँजो). हे पहिले वाद्य मी स्वतः हाताळून पाहिलेले. त्यावर भरतने आम्हाला "जिंदगी एक सफर है सुहाना" शिकवले होते. अर्थात एक-दोन ओळीच.
हे सर्व किशोर वयात असतांना चालू होते.

 एक नवीन माहिती अशी मिळाली की मोठमोठे प्रोड्युसर डायरेक्टर, आपल्या पिक्चर मध्ये एक धून सतत वाजवत असतात. ती त्या पिक्चरची थीम असे. उदा. सुभाष घईच्या पिक्चरमध्ये हे हमखास असायचं. कर्ज, क्रोधी, विधाता, मेरी जंग, कर्मा. राज कपूर सुद्धा "RK" च्या पिक्चरच्या संगीताबद्दल चोखंदळ होता. "राम तेरी गंगा मैली"च्या गाण्यात  रवींद्र जैनला संधी देऊन नवीन काही करण्यात राज कपूर पुढे होता.

८५-८६ मध्ये के.सी.बोकाडीया नावाचा एक प्रोड्युसर आला, "प्यार झुकता नहीं" घेऊन. तुमसे मिलकर ना जाने क्यो, हे गाणे सर्वांच्या ओठावर होते. त्याचे संगीत बहुदा पहिले "ऑफिशियल" T-सिरीज वर असेल. 
के.सी.बोकाडीयाचे पिक्चर "कामचलाऊ" असले तरी, त्यातली गाणी त्यावेळी खूप गाजली. 

१९८७ साली गावात TV आले. पण २४ तास नसल्याने रेडिओ-टेपची जागा अबाधित होती.
दहावी पास होऊन धुळ्यात polytechnic ला जाई पर्यंत कान फिल्मी गाणे ऐकून तयार झाले होते. 

क्रमशः 

संजय सोनार

Wednesday 26 August 2020

माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल - दर्द-ए-डिस्को

माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल

भाग १ - विशेष पुरवणी
दर्द-ए-डिस्को

ढोबळ मानाने, माझ्या लहानपणी सिनेयुगाचे दोन भाग करता येईल. १९८० च्या आधीचा आणि नंतरचा. 

१९८० पूर्वीचा- 
अर्थात माझा जन्म काही हडप्पा मोहंजोदडोच्या काळातला नाही. त्यामुळे मला आठवतो तो काळ साधारण ७८ नंतरचा. अमिताभ सुपरस्टार पदाच्या उच्च स्थानी असतांना, मी साधारण ५-६ वर्षांचा असेल. पण आमच्या घरात सिनेमा पाहणे वर्ज्य नव्हते. आम्ही सहकुटूंब सगळे पिक्चर पाहिले आहेत.
गाण्यांच्या दृष्टीने (की श्रुतीने) जे लक्षात राहिलेत ते असे.
मेरे पास आवो मेरे दोस्तो - अमिताभच्या आवाजातील पहिलं गाणं. रेडिओवर आले की आवाज एकदम फुल्ल असायचा. मि. नटवरलाल मधले अजून "परदेसीयां" पण छान होतं.
डॉन मधले खैके पान बनारस वाला, मैं हू डॉन.
मुकद्दर का सिकंदर मधले ओ साथी रे, सलाम ए इश्क.
"आँखीयोके झरोकोंसे"चे टायटल सॉंग तर आईला सुद्धा खूप आवडायचे. अजूनही हे गाणं ऐकतांना अंगाईगीत ऐकल्या सारखे वाटते. 
१९७८ मधली दोन गाणी जी भारतातल्या सर्व लग्नांच्या मिरवणुकीत अजूनही वाजवली जातात ती म्हणजे - "मुंगडा मुंगडा" आणि "आज मेरे यार की शादी है".
मामाच्या लग्नात मी आणि माझा मावसभाऊ डॉनच्या गाण्यावर नाचलो होतो.
७९ मध्ये अमिताभचा "काला पत्थर" आला होता. त्यातले "एक रास्ता है जिंदगी" छान जमून आले होते. "सरगम"चे सगळे गाणे छान होते, पण "डफलीवाले" सुपर हिट होते.

तेव्हाच्या दृष्टीने ऑफ-बिट किंवा अनवट गाण्यांमध्ये, दादा पिक्चर मधले "दिल के टुकडे", "नुरी"चे टायटल सॉंग हे होते.

 फिरोझ खानचा कुर्बानी पण तेव्हाचा. "बात बन जाए", "लैला ओ लैला", असली गाणी तेव्हाच्या मानाने काय आत्ता सुध्दा पाहिलीत तर खूप "बोल्ड" आहेत.
कल्याणजी आनंदजीचे संगीत असले तरी त्यात नक्की बाबला, विजू शाह, आणि काही पाकिस्तानी संगीतकारांनी हातभार लावला असणार. 
जसा कल्याणजी आनंदजींचा कुर्बानी, तसा लक्ष्मी-प्यारे यांचा "कर्ज". तो देखील ८० सालचा. कर्जचे संगीत खूप सुमधुर नसेल, पण त्यातला Orchestra (वाद्यवृंद) तुफान आहे. आजही तुम्ही Dolby वर कर्जची गाणी ऐका, लगेच प्रत्यय येईल. "ओम शांती ओम" पेक्षा मला "दर्द ए दिल" मधले musical pieces जास्त आवडतात. 
ह्यावर्षीचे अनवट गीते म्हणजे "चांद जैसे मुखडेपे", "छुकर मेरे मन को".

१९८० नंतरचा काळ- 
८०च्या शेवटी, किंबहुना ८१ च्या सुरुवातीला, "शान" आला. RD चे संगीत, "यम्मा यम्मा", "जानू मेरी जान", आणि आशा भोसलेंनी गायलेले "प्यार करने वाले". RD चे बरेच पिक्चर HMV कडे न रेकॉर्ड होता, Music India (EMI) किंवा Polygram वर असायचे. त्यामुळे रेकॉर्डिंगचा दर्जा उत्कृष्ट असायचा. 
"आशा" नावाचा एक पिक्चर आला होता. मोठ्या मंडळींना आवडेल असा. दादांच्या ITI मधल्या एका सरांनी, ह्यातले फक्त "शिशा हो या दिल हो" ह्या गाण्यासाठी "आशा" १५-२० वेळा पाहिला असेल. 

८१ मध्ये आलेला "एक दुजे के लिये" म्हणजे तेव्हाचा "सैराट" होता. सगळी गाणी तोंडपाठ असायची. अगदी गाण्यातल्या तामिळ शब्दांसकट- "आपडिया", "परवाइल्ले".

अमिताभचा "नसीब" सुद्धा musical होता. त्यातले "चल मेरे भाई" गाणे आमचे फेव्हरेट होते. गल्लीतल्या वात्रट मुलांनी, मला आणि आप्पाला सांगितले की "चल मेरे भाई" हे गाणे "इंसाफ का तराजू" मधले आहे. त्यामुळे आम्ही नको त्या वयात नको तो पिक्चर बघून आलो.
"लावारीस" देखील तेव्हाचा, "मेरे अंगनेमे", "अपनी तो जैसे तैसे", तेव्हा आवडायचे आणि आता "कब के बिछडे". आम्ही तेव्हा "सिलसिला" पाहिला नाही. कारण अमिताभ असून पिक्चरमध्ये व्हिलन नाही, मारामारी नाही, हे म्हणजे 'गुलाबजाम आहे पण गोड नाही', असा प्रकार होता. त्यातले गाणे मात्र रेडिओवर ऐकायचो, देखा एक ख्वाब, रंग बरसे. 
RD ने त्या वर्षी दोन स्टारपुत्रांच्या पिक्चरला संगीत दिले, एक रॉकी आणि दुसरा लव्ह स्टोरी. दोन्ही अल्बम आजही ऐकावेसे वाटतात. बाकी त्याकाळी RD म्हणजे मिडास राजा होता. 
ह्या काळचे हटके गाणे म्हणजे "तू इस तरह से". 

८२ च्या मध्याला, "कुली"च्या शूटिंगच्या दरम्यान अमिताभचा अपघात झाला. रेडिओ आणि पेपर मध्ये बातम्या यायच्या. मी आणि आप्पा, आम्ही अमिताभचे भक्त असल्याने येता-जाता मनोमन प्रार्थना करत असू की अमिताभला लवकर बरे होऊ दे!
दरम्यान ८२ मध्ये आलेला "खुद्दार" पहायला आम्ही रात्री पावसात गेलो होतो. "अन्ग्रेजी मे कहते है", हे बिनाकाला पहिले आले होते.
आमच्या आणि करोडो भारतीयांच्या प्रार्थनेने अमिताभ काही दिवसांनी बरा झाला.

अजून काही गाजलेले अल्बम म्हणजे 
"प्रेमरोग", "उमराव जान", "सनम तेरी कसम", "सत्ते पे सत्ता", "महान", "कालिया", "'तेरी कसम", "जमाने को दिखाना है", ह्यातले ६ RD चे आहेत. 
नाझिया हसनचे अजून एक गाणे आपण उचलले होते "बूम बूम" - स्टार पिक्चर मध्ये.
प्यासा सावन मधले "मेघा रे मेघा रे", प्रेमगीतचे "होठोसे छु लो तुम", हे देखील ह्याच काळातले.

८३ साली "शायद मेरी शादी का" हे बिनाका टॉपला होते. RD ने अजून एका स्टारपुत्रासाठी संगीत दिले होते - बेताब. "निकाह" हा अतिशय डोक्यावरून गेलेला पिक्चर पाहिला, पण त्यातले मला "चुपके चुपके रात दिन" आवडले. नंतर कळले की "गुलाम अली" कोण आणि काय चीज़ आहे ते. आमची हिंमत तेव्हा जितेंद्रचा "हिम्मतवाला" वगैरे पाहण्याची होती. 
मिथुनचा "डिस्को डान्सर" पाहिला नाही. पण गाणे खूपदा ऐकले. 
कमल हसनच्या "सदमा"चे संगीत तेव्हा कधी कानावर पडले नाही. पण आता ऐकतो तेव्हा 
आपण काय मिस केले ते कळते. त्यातली श्रीदेवी सुद्धा खूप उशिरा कळली. 


क्रमशः

संजय सोनार

Tuesday 25 August 2020

एक प्रार्थना

 पुलंची एक प्रार्थना बऱ्याच जणांना माहीत असेल, तशीच माझी एक प्रार्थना आहे.


हे देवा, मला थोडीशी "असंवेदना" दे, किंवा अति असलेली संदेवना कमी कर. वेगवेगळे लोक, मला जी माहिती पुरवतात (मला नको असतांना), त्याकडे दुर्लक्ष करण्याची मला शक्ती दे. 

मला समाधान मिळण्यासाठी अगदी थोड्यात माझे निभावून ने. वाटल्यास मला "अल्पसंतुष्ट" केलेस तरी चालेल.
 माझे हसणे फक्त उच्च दर्जाचे विनोद आणि dark humour पुरते मर्यादीत न राहता, मला हलक्या फुलक्या विनोदाने भरपूर हसू येऊ देत. अगदी बालिश विनोदाने सुद्धा मला हसू आले तरी चालेल.
मला साध्या मसाला पिक्चरमध्ये आनंद मिळू देत. Netflix आणि Prime ची लत मला लागू देऊ नकोस.
साध्या क्रोसिनने बरे वाटू देत, अँटिबायोटिक पर्यंत मामला नेऊ नकोस.
एका बिअरमध्ये आऊट कर, पण क्वार्टर रिचवण्याची क्षमता देऊ नकोस.
माझ्या जिभेला वरण-भाताची चटक नसेल कदाचित, पण अगदीच पापलेट आणि मटणाचे डोहाळे मला लावू नकोस.
रोज २० मिनिटे चाललो की छान झोप येऊ दे, जिम-बिमच्या नादी लावू नकोस.

🙏

संजय सोनार

क्रायसिस

हल्ली एक नवा "क्रायसिस" निर्माण झाला आहे - माझे "वाचन". 

स्वतःपुरता मर्यादित असल्याने हा फार गहन किंवा गंभीर विषय नाही. मला एकाग्रपणे वगैरे वाचता येतच नाही. वाचता वाचता सतत कसले तरी विचार चालू असतात. साधं उदाहरण, मित्राने लिहिलेले पुस्तक वाचायला घेतले, पण पुढे लवकर सरकता येत नाही. वाचतांना, ह्या लेखात विशेष काय आहे? मित्राला अभिप्राय लिहिताना काय-काय टिपता येईल, हे सर्व उद्योग चालू होते. 

एव्हाना मला कुठलेही पुस्तक वाचतांना भराभर पुढे जात येत नाही. कदाचित "ग्रहण-शक्ती" कमी पडत असावी. काही जुन्या गोष्टी आठवतात, काही ठिकाणी "उत्सुकता" उफाळून बाहेर येते, मग गूगल करा, विकीपेडिया, एका लिंकवरून दुसऱ्या. डोक्यातल्या  सगळ्या लिंक जागेवर परत आल्या की, "कुठे होतो मी?" असं म्हणून पुन्हा पुस्तकात जाण्याचा प्रयत्न! एकूणच, कोणीतरी माझी परीक्षा घेणार आहे, असा काहीसा समज करून मी वाचत असतो. 

मला सहजपणे वाचता येणारी गोष्ट म्हणजे "पेपर". परीक्षेतील पेपर नाही, वर्तमानपत्र! हल्ली कोरोनाच्या बातम्यांमुळे तेही वाचायला कंटाळा येतो. रोजचे आकडे बघून कालचे किती होते? पुन्हा परीक्षेचा फील.
कदाचित वाचनाची सवय नसल्याने असेल. आता थोडे वाचन वाढवावे लागणार, आणि विचार कमी ! :)


संजय सोनार

माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल भाग १

माझी सांगितिक (ऐकीव) वाटचाल

भाग १


ह्या लेखातून मला वेगवेगळ्या संगीत प्रकारांची, गायकांची ओळख कशी झाली ते सांगण्याचा प्रयत्न आहे. 
खरंतर माझ्या सारख्या माणसाने स्वतःच्या गाण्यांच्या "षोक"ला सांगितिक वाटचाल म्हणणे म्हणजे, असू द्या.. "गांडूळ-शेषनाग, उंदीर-ऐरावत" ह्या चांगल्या उपमा पुलंनी आधीच वापरल्याने मी काही नवीन उपमा देणे म्हणजे, राम गोपाल वर्माने "देवदास"चा रिमेक केल्यासारखे होईल.

मला कळायला लागल्यापासून घरात रेडिओ असल्याने, रेडिओवरची गाणी हा एक अविभाज्य भाग आहे. आणि तो आजतागायत आहे. फक्त माझा आणि रेडिओचा आकार व्यस्त प्रमाणात बदलत राहिला. रेडिओ आधी मोठ्ठा होता, मग ट्रान्झिस्टर, पॉकेट रेडिओ व आता मोबाईल ऍप पर्यंत छोटा झाला. आणि माझा आकार.. असू द्या.

हल्ली जसा घरोघरी टीव्ही असतो तसा पूर्वी रेडिओ असायचा. हा काळ १९७८ ते ८८ मधला आणि गाव नंदुरबार. मुळात दादांना हिंदी फिल्मी गाणे खूप प्रिय होते. माझे असं अवलोकन आहे की, आपल्याला आपल्या तरुणपणी गाजलेल्या गाण्यांपेक्षा आपण बाल्य अवस्थेत असताना आलेली गाणी जास्त आवडतात. दादांचे तसेच काहीसे असेल. त्यांना १९५० ते ६० च्या दशकातील गाणी आवडायची. रेडिओला पूर्वी फार काही पर्याय नव्हते, जे पदरात पडेल ते गोड मानून घ्यायचे. दादांचे आवडते जुने गाणे सुरुवातीला कंटाळवाणे वाटायचे, पण नंतर ते आवडू लागले.

दादांमुळे आणि रेडिओमुळे आम्हाला अमुक गाणे अमुक सिनेमातले, विशेष करून पडद्यावरचे कलाकार कोण होते हे कळले. दादांचे आवडते कलाकार म्हणजे राजकपूर, गुरुदत्त, दिलीपकुमार हे.
रेडिओमुळे संगीत क्षेत्रातील कलाकार कळू लागले. गायिका आहेत - लता मंगेशकर, संगीतकार - शंकर जयकिशन. उर्दू सर्व्हिस वाले - नगमानिगार है हसरत जयपुरी, असले सामान्य ज्ञान बालपणी प्राप्त झाले.
आम्हा भावंडाना तेव्हाची नविन गाणी रेडिओ वाजली की मजा यायची. पण रेडिओ वाल्यांचा असा काही नियम असावा की गाणं चांगलं ४-५ वर्ष जुनं झालं, छान लोणच्या सारखं मुरलं की मगच ते रेडिओवर वाजवायचं. 
आता त्यातली काही ऐकली तर आपण का ही गाणी सहन केलीत?  असा प्रश्न पडतो. उदा. "ओ देवी श्रीदेवी, तू नही"..वगैरे.
ह्यातली बरीच (आता टुकार वाटतात) गाणी जितेंद्रच्या पिक्चर मधली असायची.
अमिताभच्या पिक्चरला ऍक्शन जास्त असली तरी गाणी चांगली असायची. नशिबाने, तेव्हाची बरीच गाणी RD बर्मनची सुद्धा असल्याने ती गाणी तेव्हाच काळाच्या पुढची होती. 

दादा दर बुधवारी न चुकता "बिनाका गीतमाला" रेडिओ सिलोनवर ऐकत. बिनाकामध्ये फक्त नविन गाणी वाजविली जायची त्यामुळे आम्हीही ते आवडीने ऐकायचो. शॉर्ट वेव्ह रेडिओला तेव्हा २-३ मिनिटे प्रयत्न केला की स्टेशन ट्यून व्हायचे. मधेच एखादे स्टेशन पकडले जायचे जिथे अरबी किंवा फारशी भाषेत बातम्या सुरू असायच्या. 

बिनाकाचे सर्वेसर्वा अमीन सायनी यांना आम्ही "बैनो भय्यो" म्हणायचो. बिनाकाचा वार्षिक कार्यक्रम म्हणजे एक पर्वणीच असायची. डिसेंबरच्या शेवटच्या दोन बुधवारी तो असायचा. आम्हाला उत्सुकता असायची की ह्या वर्षी कोणते गाणे पहिले येणार. टीव्ही नसल्याने नवीन वर्षाचे "रंगारंग" कार्यक्रम तेव्हा आमच्या नशिबी नव्हते. 

संजय सोनार
(क्रमशः)